Kishoribai – taking mere mortals closer to the divine

“बाई नाही रे, ताई, ताई. किशोरीताई म्हणतात त्यांना!” माझे मित्र लगेच बोलायचे. पण मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा किशोरीबाई असं सांगितलं आणि तेच डोक्यात फिट बसलंय.
रात्री मित्राचा मेसेज आला – अरे ताई गेल्या रे! मी हातरूणात होतो, सुन्न झालो, फोन बंद केला, डोळे मिटून झोपायचा प्रयत्न केला तर त्यांचाच चेहरा येई समोर. आणि मग सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
लहानपणी शाळेत जायची तयारी करत असताना रेडियोवर गाणी लागलेली असायची. नेहमीच्या भावगीत, भक्तिगीतांमध्ये एकदा ‘जाईन विचारीत रानफुला’ ऐकलं. लता, आशा, सुमन कल्याणपूर ह्या नेहमीच्या आवाजांमधला तो आवाज नक्कीच नव्हता. आईला विचारलं, तिला नव्हतं माहित. “किशोरी, मोगूबाईंची मुलगी.” कोणीतरी सांगितलं.
मी जास्त विचारलं नाही पुढे.
रात्रीच्या वेळेस रेडियोवर शास्त्रीय संगीत लावायचे, तेव्हा एकदा केदार चालू होता. “किशोरीचा आवाज ना?” मी विचारलं.
“किशोरी?!? शाळेत आहे का ती तुझ्या? किशोरीबाई म्हण; साधं काम नाही ते, येता जाता नाव घेण्याइतकं”
नंतर जसं इंटरनेट वापरायला लागलो तेव्हा जास्त गाणं ऐकू लागलो त्यांचं. लहानशा गावात असून सुद्धा माझ्या सुदैवानी मला लहानपणापासून चांगलं संगीत ऐकायला मिळालं; पण किशोरीबाईंचं  गाणं हे मी ऐकलेल्यापेक्षा खूपच, खूपच वेगळं  होतं. मला अजूनही शास्त्रीय संगीत कळत नाही, घरात भजनाची परंपरा असूनही मी कधी शिकलो नाही गाणं, पण किशोरीबाईंचं  गाणं ऐकताना नेहमी वाटतं, निदान गाणं ऐकायला शिकलो तर आत्ता जे अनुभवतो त्यांचं गाणं ऐकताना, त्यापेक्षा भरपूर काहीतरी मिळेल. पूर्वी कधीही थोडं low वाटलं कि मी समुद्रावर जाऊन बसायचो, सोबतीला फोनमधली गाणी. त्या प्लेलिस्ट मधलं  एक फिक्स गाणं म्हणजे – जाणे मी अजर – ज्ञानोबांची ओवी आणि किशोरीबाईंचा आवाज. उत्कट, भव्य, दैवी.
त्यांचा गाण्यातले शास्त्रीय बारकावे, technicalities वैगेरे हे सगळं संगीतातली तज्ज्ञमंडळी सांगतच असतात. पण देवत्व, दैवी, divine, heavenly ह्या शब्दांचा नेमका अर्थ काय तो किशोरीबाईंचं गाणं ऐकताना कळतो. मी त्यांची शेवटची मैफिल मकरसंक्रांतीच्या दिवशी IES च्या ऑडिटोरियम मध्ये ऐकली, संध्याकाळची मैफिल… त्यांनी झिंजोटी गायला सुरुवात केली. माईक, लाईट्स वैगरे सगळं अड्जस्ट होऊन, त्यांना नेमका सूर सापडेपर्यंत थोडा वेळ गेला. पण जेव्हा सुरु झालं, तेव्हा तो एक प्रवास होता, शंकराच्या देवळापर्यंत. हे शिव गंगाधर’ हि बंदिश गायली त्यांनी. जसं त्या गात होत्या तसं शंकराचं विराट, पण शांत आणि योगी स्वरूप समोर साकार होत गेलं. sure, मला शास्त्रीय संगीत नाही कळत, पण हे जे अनुभवांचं सोनं मिळतं किशोरीबाईचं  गाणं ऐकून, त्यासाठी मी ऐकतो.

शास्त्रीय संगीत म्हणजे कठोर तपस्या, प्रचंड अभ्यास, कडक शिस्त हे मी ऐकलं आणि अनुभवलं होतं. बऱ्याच मोठ्या गायकांनी शास्त्रीय संगीताला जवळ जवळ कर्मकांडाचं  रूप दिलेलं. मला त्याबद्दल आदर नक्कीच होता, पण आपुलकी वाटली ती किशोरीबाईंमुळे. त्यांनी शास्त्राचा अभ्यास भरपूर केला, पण शास्त्रीय संगीत हे मुळात भावसंगीत आहे, आणि जर तो भाव जागा होत नसेल तर ते फक्त एक शास्त्र झालं असं  त्यांचं म्हणणं होतं.
भिन्न षड्ज ह्या डॉक्युमेंट्री मध्ये त्या म्हणाल्या होत्या – आपण जे करतो ते देवासाठी, ही समर्पणाची भावना ठेवून करायचं. त्यामुळे त्या गाताना एक तपस्या म्हणूनच गायच्या. पण जेव्हा त्या गायच्या, समोर बसलेल्या प्रत्येकाला असं वाटत असावं कि ह्या आपल्यासाठीच गातायत, निदान मला तरी असं वाटायचं. गाताना एखादी तान  किंवा सूर व्यवस्थित नाही वाटलं कि टिपिकल कोकणी स्वरात- छे! असं  म्हणून पुन्हा एकदा तीच तान परत घ्यायच्या.  mediocrity ला जागाच नाही कुठे, right from the amount of lights in the auditorium to the seating arrangement for the audience. She looked at it that everything is perfect. लाईट जरा जास्त झाल्या कि म्हणायच्या – “अरे दिवे कमी करा रे, इकडे तुम्ही गाणं ऐकायला आलायत, बघण्यासारखं काही नाही!”

Her music had a strange power, she was like a mentalist who could reach to the deepest corners of your mind and heart and the simplest of her notes would hypnotize you, creating an ever-lasting memory.

त्यांनी रागातला भाव कधीच कमी केला नाही, कितीही कठीण राग किंवा बंदिश असो. त्यामुळे मारवा ऐकताना नेहमी डोळे पाणावतात, शिवस्तुती ऐकताना गावातल्या शंकराच्या देवळातल्या काळोख्या, थंड जमिनीवर मंद दिव्याच्या प्रकाशात बसलोय असंच वाटतं, भूप ऐकताना शंभर समयांचा सुंदर झगझगाट होतो, मल्हार ऐकताना मुसळधार पाऊस पडल्याचा अनुभव येतो, आणि अभंग आणि भजन ऐकताना साक्षात पांडुरंग समोर उभा राहतो. कधी पंढरीच्या वारीची अनुभूती घ्यायची असेल तर त्यांनी गायलेला गजर ऐका – ज्ञानोबा माउली तुकाराम. फक्त तीन शब्द, पण त्यांच्या सुरांच्या जादूमुळे दिंडी, रिंगण, चंद्रभागेच्या वाळवंटातल्या दिंड्या पताका आणि नाचणारे वैष्णव, सगळं समोर दिसतं.
बागा बीच वर पहाटे ३.३० – ४.०० ला मी त्यांची भैरवी ऐकत चालत होतो, समुद्राचा आवाज, चांदण्यांनी भरलेलं आकाश आणि हे गाणं, हा अनुभव शब्दात सांगून नाही कळणार. तांबडी सुरल्याच्या महादेवाच्या मंदिरात बसून बहादुरी तोडी ऐकलेला – पार्वतीपती महादेव. खेडला मुसळधार पावसात चालताना अडाणा मल्हार ऐकलेला – आयी बदरिया कारि कारि. आजूबाजूला जोरदार सरी आणि हेडफोनमध्ये ह्या स्वर्गीय स्वरांच्या सरी. घरच्या पडवीत बसून ना. धों. महानोरांच्या कवितांसोबतच किशोरीबाईंचा गौड मल्हार ऐकलेला. त्यांनी मला काय दिलं, तर हे सगळे सोनेरी अनुभव जे शेवटपर्यंत माझ्या सोबत राहतील.
काहीजण विचारतात मला, अरे तुला कळत नाही शास्त्रीय संगीत मग कशाला उगाच जातोस ऐकायला? सौंदर्य, भव्यता, उत्कटता, परफेक्शन म्हणजे काय,चांगलं गाणं म्हणजे काय, डेडिकेशन, कमिटमेंट, तपस्या, अभ्यास म्हणजे काय, हे मला किशोरीबाईंच्या गाण्यातून कळतं. म्हणून ऐकतो. त्यांचं  संगीत काही क्षणांसाठी मिळतं, पण तो जो अनुभव असतो, तो आयुष्य उजळवून टाकणारा असतो, म्हणून मी ऐकतो. त्या गेल्या नाहीत. सगळ्या सुरात त्या भरून राहणार, त्यांचे सूर राहणार. माझ्यासारख्या साध्या माणसांना देवत्वाची अनुभूती देत.
Taking us mere mortals one step closer to the divine.